ताज्या घडामोडीमहाराष्ट्रशहर

शिरूर शहरात मतदार यादी पुनर्परीक्षण मोहिमेला वेग; ३० जुलैपर्यंत BLO करणार घरभेटी


नवीन मतदार नोंदणी, नाव-दुरुस्ती आणि स्थलांतरित मतदारांची माहिती अद्ययावत करण्यासाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन


शिरूर :चावडीराज न्युज नेटवर्क
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमांतर्गत शिरूर नगरपरिषद हद्दीत मतदार यादी पुनर्परीक्षण मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेला वेग आला आहे. शहरातील एकही पात्र नागरिक मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) नागरिकांच्या घरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत.
शिरूर नगरपरिषद, घोडनदी यांच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, दि. २९ जून २०२६ ते दि. ३० जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घराला प्रत्यक्ष भेट देऊन EF (Enumeration) Form वितरित करतील. नागरिकांकडून आवश्यक माहिती व कागदपत्रांच्या आधारे हे फॉर्म भरून घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
या मोहिमेद्वारे नवीन पात्र मतदारांची नोंदणी, नाव, पत्ता, वय, छायाचित्र किंवा इतर तपशीलांमधील दुरुस्ती तसेच मृत किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांची माहिती अद्ययावत करण्यात येणार आहे.
शिरूर शहरातील सर्व सुजाण नागरिक, नवमतदार, नवविवाहित महिला आणि नवीन रहिवाशांनी आपल्या नावाची मतदार यादीत नोंद असल्याची खात्री करून घ्यावी. आवश्यक असल्यास संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे आवश्यक अर्ज व कागदपत्रे तात्काळ सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
BLO घरी आल्यानंतर त्यांना आवश्यक सहकार्य करावे. Enumeration Form अचूक आणि पूर्ण भरून द्यावा.आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात. मतदार यादीतील नाव, पत्ता, वय व इतर तपशील तपासून आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी. मृत अथवा कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांची माहिती प्रशासनास द्यावी.
शहरातील प्रत्येक पात्र नागरिकाची मतदार यादीत नोंद सुनिश्चित करण्यासाठी आणि लोकशाही प्रक्रियेत सर्वांचा सहभाग वाढविण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना पूर्ण सहकार्य करून ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन शिरूर नगरपरिषद, घोडनदी यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *