क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रशहर

शिरूरच्या मध्यवर्ती भागातील हॉटेल पुन्हा चर्चेत; तरुणीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी सात जणांवर गुन्हा


शिरूर 🙁 प्रतिनिधी)
शिरूर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या एका लॉजिंगमध्ये चांगल्या पगाराचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी सात जणांसह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी पीडित तरुणीला चांगल्या पगाराचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून शिरूर शहरातील एका लॉजिंगमधील खोलीत आणण्यात आले. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच एका आरोपीने तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचेही पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी दिपक श्रीमंदीलकर, अजय घेगडे, ऋषीकेष ढवळे, दिपक भोसले, सागर ढवळे, अनिकेत पठारे आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी याच हॉटेलमधून अमली पदार्थांशी संबंधित धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता याच ठिकाणी तरुणीवरील लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघडकीस आल्याने शिरूर शहरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील हॉटेल व लॉजिंगच्या ठिकाणी सुरू असलेल्या गैरप्रकारांवर पोलिसांनी अधिक कडक नजर ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान, या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नकाते करीत असून, घटनास्थळावरील उपलब्ध पुरावे, संबंधित व्यक्तींची माहिती तसेच तांत्रिक व भौतिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. सर्व आरोपींचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
गुन्हा दाखल अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नकाते असून, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *