शिरूर पोलीस स्टेशनच्या नव्या वास्तूत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण
शिरूर : (प्रतिनिधी )सुदर्शन दरेकर
शिरूर पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीमध्ये ८०वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या हस्ते पार पडले यावेळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील,अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिरूर पोलीस स्टेशन नवीन प्रशस्त वास्तूमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर प्रथमच या परिसरात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात पार पडला. यानिमित्ताने पोलीस स्टेशनचा परिसर आकर्षक रांगोळी, विद्युत दिव्यांच्या झगमगाटाने सजविण्यात आला होता. या सजावटीमुळे नवीन वास्तूचा परिसर अधिकच प्रसन्न आणि आकर्षक दिसत होता.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिसरात वृक्षारोपण केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नवीन वास्तूच्या परिसरात हिरवाई वाढविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
दरम्यान, शिरूर-हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांनी शिरूर पोलीस स्टेशनला भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त अशा या नवीन पोलीस स्टेशनच्या इमारतीमधून नागरिकांना अधिक चांगली आणि सुलभ पोलीस सेवा मिळेल, अशी अपेक्षा आमदार कटके यांनी व्यक्त केली.
“समाजातील सर्व घटकांना समान न्याय देण्याचे कार्य या नवीन वास्तूमधून अधिक प्रभावीपणे होईल. नागरिकांना सुरक्षित वातावरण देतानाच त्यांच्या अडचणींना तत्परतेने प्रतिसाद मिळावा,” अशी अपेक्षाही आमदार कटके यांनी व्यक्त केली.
यावेळी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या हस्ते पोलीस मित्रांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. पोलीस प्रशासनाला नागरिकांच्या सहकार्याची मोठी गरज असून, पोलीस मित्रांच्या माध्यमातून पोलीस आणि नागरिकांमधील समन्वय अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असे यावेळी सांगण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमास शिरूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस मित्र तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या वास्तूमधून शिरूरकरांना अधिक प्रभावी, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख पोलीस सेवा देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

संपादक : सुदर्शन दरेकर

