क्राईममहाराष्ट्रशहर

शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! डीपी फोडून तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोन सराईत आरोपी अटकेत, १८ गुन्ह्यांची उकल


शिरूर : चावडीराज न्यूज नेटवर्क
शिरूर पोलिसांच्या डीबी पथकाने वीज वितरण कंपनीचे विद्युत रोहित्र (डीपी) फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल १८ गुन्ह्यांची उकल झाली असून सुमारे ३०० किलो तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या आहेत.
१ ते २ जानेवारी २०२६ दरम्यान आण्णापूर (ता. शिरूर) येथील येवलेमाथा परिसरात शेतातील विद्युत रोहित्र फोडून सुमारे १५० किलो तांब्याच्या तारा चोरीला गेल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा कलम १३६ व भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शरद वारे करीत आहेत.
मागील काही महिन्यांपासून शिरूर तालुक्यात डीपी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकरी, ग्रामस्थ तसेच उद्योगधंद्यांना मोठा फटका बसत होता. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व डीबी पथकाने गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला.
पोलीस अंमलदार विजय शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हुडको कॉलनी परिसरात सापळा रचून संतोष बारकू भालेराव आणि किरण गोविंद खंडांगळे (दोघेही रा. जळुके बुद्रुक, ता. खेड, जि. पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी आण्णापूर येथील चोरीची कबुली दिली.
पोलिस कोठडीत सखोल चौकशी केल्यानंतर या आरोपींनी साथीदारांच्या मदतीने शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाकळी हाजी बेट परिसरात आणखी १८ ठिकाणी डीपी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार संबंधित गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून आरोपींकडून सुमारे ३०० किलो तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या आहेत.
या धडाकेबाज कारवाईमुळे शिरूर तालुक्यातील डीपी चोरीच्या मालिकेला मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत असून पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *