पुणे–अहिल्यानगर महामार्गाच्या सुरक्षेसाठी निलेश वाळुंज यांचे पाचव्या दिवशीही उपोषण सुरू
शिरूर 🙁 प्रतिनिधी )सुदर्शन दरेकर
राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ पुणे–अहिल्यानगर मार्गावरील वाढते अपघात, वाहतूक सुरक्षेकडे होणारे दुर्लक्ष आणि महामार्गावरील दुभाजक फोडून अनधिकृत मार्ग तयार करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज यांनी शिरूर तहसील कार्यालयासमोर १८ ऑगस्टपासून उपोषण सुरू केले आहे. शनिवारी उपोषणाचा पाचवा दिवस असून, वाळुंज यांचे आंदोलन अद्याप सुरू आहे.
पुणे–शिरूर महामार्गावरील विशेषतः शिरूर बायपास परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाळुंज यांनी केली आहे. संबंधित अधिकारी तसेच महामार्गावरील दुभाजक फोडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांची जबाबदारी निश्चित करून सदोष मनुष्यवधासह लागू असलेल्या कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
‘सुरक्षित रस्ता आणि सुरक्षित प्रवास हा प्रशासनाचा उपकार नसून नागरिकांच्या जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याच्या घटनात्मक अधिकाराचा भाग आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित रस्ता उपलब्ध करून देणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. जनतेचे जीव वाचविण्यासाठी आता टोलवाटोलवी न करता जबाबदारी निश्चित झाली पाहिजे,’ अशी भूमिका वाळुंज यांनी मांडली आहे.
दरम्यान, शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी उपोषणस्थळी भेट देऊन वाळुंज यांच्याशी चर्चा केली. तसेच त्यांच्या मागण्यांबाबत संबंधित यंत्रणांना अवगत करण्यात आले आहे. मात्र, मागण्यांवर ठोस कार्यवाही होईपर्यंत वाळुंज यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे.
महामार्गावरील अपघातांना आळा घालण्यासाठी तातडीने सुरक्षा उपाययोजना करणे आणि यापूर्वी केलेल्या पत्रव्यवहारावर कार्यवाही करणे, या मागण्यांकडे प्रशासन आता कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

संपादक : सुदर्शन दरेकर
