६१व्या वर्षी शिरूरच्या मिसाळ दाम्पत्याने सर केले कळसुबाई शिखर; सर्व स्तरातून होतोय कौतुकाचा वर्षाव!

शिरूर 🙁 प्रतिनिधी)
चैतन्य वन आयोजित कळसुबाई शिखर ट्रेकिंग मोहिमेत महाराष्ट्रातील सुमारे ४०० जणांच्या चमूसोबत शिरूर तालुक्यातील राजेंद्र मिसाळ व शारदा मिसाळ या दाम्पत्याने वयाच्या ६१व्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर यशस्वीपणे सर केले.

औरंगाबाद येथील गुरुमाऊली ध्यान योग शिबिराशी संबंधित या मोहिमेअंतर्गत सहभागी झालेल्या चमूमध्ये मिसाळ दाम्पत्याने उत्साहाने सहभाग घेतला. समुद्रसपाटीपासून सुमारे ५,४०० फूट उंचीवर असलेले कळसुबाई शिखर सर करण्यासाठी चार ते पाच तासांचा खडतर प्रवास करावा लागतो. चढाईचा अवघड मार्ग, बदलते हवामान आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत मिसाळ दाम्पत्याने कोणताही अडथळा न येऊ देता शिखर गाठले.
शिरूर तालुक्यात अनेक वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे राजेंद्र मिसाळ व सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापिका शारदा मिसाळ यांनी वयाच्या ६१व्या वर्षी केलेली ही कामगिरी विशेष कौतुकास्पद ठरली आहे. वयाची साठी ओलांडल्यानंतरही शारीरिक तंदुरुस्ती, आत्मविश्वास आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आव्हानात्मक मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करता येतात, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
मिसाळ दाम्पत्याच्या या प्रेरणादायी कामगिरीबद्दल शिरूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या साहसी कामगिरीने ‘वय हे केवळ एक आकडा आहे; जिद्द असेल तर कोणतेही शिखर गाठता येते’ हा संदेश समाजासमोर ठेवला आहे.

संपादक : सुदर्शन दरेकर
