ताज्या घडामोडी

शिरूर आठवडे बाजारातील सुरक्षेचा पोलिसांकडून आढावा; नाकाबंदीद्वारे वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई


शिरूर, : चावडीराज न्युज नेटवर्क


शिरूर शहरातील मार्केट यार्ड येथे दर शनिवारी भरत असलेल्या आठवडे बाजारातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा शिरूर पोलिसांनी शनिवारी (दि. 20) घेतला. सकाळी 10.30 ते 11.00 वाजेच्या दरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाजार परिसराला भेट देऊन नागरिक, शेतकरी व व्यापाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
शिरूर शहरासह पंचक्रोशीतील नागरिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व पारनेर तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी व ग्राहक आठवडे बाजारात खरेदी-विक्रीसाठी येत असल्याने परिसरात मोठी गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर मोबाईल चोरी, दागिने चोरी व इतर मालमत्तेविरुद्धचे गुन्हे घडू नयेत यासाठी पोलिसांनी विशेष पेट्रोलिंग केले.


बाजारात उपस्थित नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सूचना व समस्यांबाबत आवश्यक उपाययोजना करण्यासाठी मार्केट यार्ड प्रशासनाला लेखी पत्राद्वारे सूचना देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, बाजाराच्या दिवशी वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेऊन वाहतूक कोंडी व पार्किंग व्यवस्थापनाबाबत शिरूर नगरपालिकेशी समन्वय साधून उपाययोजनांबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
याच अनुषंगाने सकाळी 11.00 ते 11.30 वाजेदरम्यान पाबळ फाटा चौक आणि एस.टी. स्टँड चौक येथे विशेष नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान ब्लॅक फिल्म लावलेली वाहने, नंबर प्लेट नसलेली वाहने, वाहन चालविण्याचा परवाना नसलेले चालक तसेच विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.


आठवडे बाजारातील नागरिकांची सुरक्षा, गुन्हे प्रतिबंध आणि वाहतूक शिस्त राखण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशनकडून अशा प्रकारच्या उपाययोजना सातत्याने राबविल्या जात असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *