पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० शेतकरी कर्जमुक्त; ३४५ कोटींचा दिलासा
पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० शेतकरी कर्जमुक्त; ३४५ कोटींचा दिलासा
पुणे दि. ८ : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० पात्र शेतकऱ्यांना ३४५ कोटी २५ लाख रुपयांचा कर्जमुक्तीचा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ७) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहातून आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची रक्कम ऑनलाइन संबंधित बँकांच्या कर्जखात्यात वर्ग करण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची एकूण थकबाकी ३४५ कोटी २५ लाख ५ हजार ५९४ रुपये असून, ही रक्कम थेट बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे.
राज्यात या योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या सुमारे ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर ५ हजार २८ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देशही बँकांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील पहिल्या यादीतील ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप झालेले नाही, त्यांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपादक : सुदर्शन दरेकर
