ड्रोन वापरासाठी ७ दिवस आधी पोलीस ठाण्याची पूर्वपरवानगी बंधनकारक!पुणे ग्रामीण जिल्ह्यात अनेक तक्रारी
शिरूर दि. ३० : प्रतिनिधी
पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेऱ्यांच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात कोणत्याही खाजगी व्यक्ती, इव्हेंट मॅनेजमेंट संस्था तसेच छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यापूर्वी संबंधित पोलीस ठाण्यास किमान ७ दिवस आधी माहिती देऊन प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी जारी केले आहेत.
पुणे ग्रामीण जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे, धरणे आणि केंद्रीय संस्थांचा समावेश असल्याने ड्रोनद्वारे टेहळणी करून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. तसेच दौंड, बारामती आणि शिरूर तालुक्यांमध्ये रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन उडत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, वाळू माफियांकडून टेहळणीसाठी तसेच इतर बेकायदेशीर कृत्यांसाठी ड्रोनचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय ड्रोनच्या माध्यमातून चोरीसारख्या गुन्ह्यांना मदत मिळू शकते, अशीही शक्यता लक्षात घेऊन हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
या आदेशानुसार ड्रोन, रिमोट-नियंत्रित मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हँग ग्लायडर, हॉट एअर बलून तसेच तत्सम सर्व हवेत उडणाऱ्या साधनांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. आवश्यक परवानगीशिवाय अशा साधनांचा वापर करता येणार नाही.
आदेशाचे उल्लंघन करून पोलीस परवानगीशिवाय ड्रोनद्वारे चित्रीकरण करताना कोणी आढळल्यास संबंधित व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २३३ अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

संपादक : सुदर्शन दरेकर

