ताज्या घडामोडीमहाराष्ट्रशहरशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

पेरू विक्रेत्यापासून पोलीस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास’; बाळासाहेब सकाटे यांचा भावपूर्ण निरोप समारंभ


“३२ वर्षांच्या निष्ठावान सेवेनंतर सेवानिवृत्त; सहकाऱ्यांकडून विशेष सन्मान, मुलीच्या कवितेने तर मुलाच्या मनोगताने वातावरण भावूक”
जुन्नर, प्रतिनिधी :
जिल्हा न्यायालय, शिवाजीनगर (पुणे) येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी बाळासाहेब सकाटे हे पोलीस खात्यातील तब्बल ३२ वर्षांच्या प्रदीर्घ व निष्ठावान सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित विशेष सत्कार समारंभात सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवरांनी त्यांच्या प्रामाणिक सेवाभावाचा गौरव करत भावपूर्ण निरोप दिला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट होते. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, “सेवानिवृत्तीचा काळ हा आयुष्याचा आनंद लुटण्याचा आणि तो इतरांनाही देण्याचा असतो. पोलीस वर्दी ही भाग्याने मिळते. त्या वर्दीचा सन्मान राखत बाळासाहेब सकाटे यांनी आपल्या कर्तृत्वाने पोलीस दलाचा मान उंचावला आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याने घ्यावा.”
यावेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक सुधीर धावडे, विलास कांबळे, राजेंद्र गुरव, पोलीस उपनिरीक्षक शेलार, भोंग, महिला पोलीस अंमलदार सूर्यवंशी, प्रा. काशिनाथ आल्हाट यांच्यासह अनेक मान्यवरांनी सकाटे यांच्या सेवाकाळातील कार्याचा गौरव करत शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना बाळासाहेब सकाटे यांनी आपल्या संघर्षमय जीवनप्रवासाची आठवण सांगितली. “एकेकाळी डोक्यावर पेरूची पाटी घेऊन विक्री करणारा मी, आज पोलीस अधिकारी म्हणून ३२ वर्षांची सेवा पूर्ण करून निवृत्त होत आहे. आयुष्यात अनेक संकटे आणि आनंदाचे क्षण आले; मात्र वर्दीचा स्वाभिमान आणि कर्तव्यनिष्ठा कधीही सोडली नाही. ही वर्दी पुन्हा मिळणार नाही, याची जाणीव ठेवून प्रत्येक दिवस प्रामाणिकपणे काम केले,” असे त्यांनी भावूक होत सांगितले.
समारंभात त्यांच्या कन्या सौ. प्रियांका भिसे यांनी वडिलांच्या कर्तृत्वावर आधारित स्वरचित कविता सादर केली. त्यांच्या कवितेने उपस्थितांचे डोळे पाणावले. तर मुलगा चेतन सकाटे म्हणाला, “आजपर्यंत माझी ओळख ‘बाळासाहेब सकाटे यांचा मुलगा’ अशी होती; आता ‘चेतन सकाटे यांचे वडील बाळासाहेब’ अशी ओळख निर्माण होईल, याचा अभिमान वाटतो.”
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार पोलीस उपनिरीक्षक भोंग यांनी मानले. संपूर्ण समारंभात बाळासाहेब सकाटे यांच्या प्रामाणिक सेवेला सलाम करत उपस्थितांनी त्यांना निरोगी, आनंदी आणि सुखी सेवानिवृत्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *