ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशहर

गूंगी गुडिया’ वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले; सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया, काँग्रेसवर टीकेची झोड”


प्रतिनिधी-
सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसमधील काही नेत्यांनी केलेल्या कथित “गूंगी गुडिया” या वक्तव्याचे राज्यभर तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत. या वक्तव्यावरून महायुती आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली असून, महिला नेतृत्वाचा अवमान झाल्याचा आरोप करत अनेक स्तरांतून काँग्रेसवर टीका होत आहे.
राजकीय वर्तुळात या वादाची तुलना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या राजकीय प्रवासाशी केली जात आहे. जानेवारी १९६६ मध्ये लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर आणि त्यापूर्वी १९६४ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर देशासमोर नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाची धुरा स्वीकारली. मात्र सुरुवातीला त्यांच्या नेतृत्वावर विरोधकांसह काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
याच काळात समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांनी ऑगस्ट १९६६ मध्ये इंदिरा गांधी यांचा उल्लेख “गूंगी गुडिया” असा केला होता. मात्र पुढे इंदिरा गांधी यांनी आपल्या ठाम नेतृत्वातून ही प्रतिमा बदलत भारतीय राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केले.
सध्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय विश्लेषकांकडून या ऐतिहासिक संदर्भाची चर्चा होत आहे. सुनेत्रा पवार यांनाही संयम, अभ्यास आणि जनसंपर्काच्या माध्यमातून स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्याची संधी असल्याचे मत काही जाणकार व्यक्त करत आहेत.
दरम्यान, काँग्रेसकडून झालेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, येत्या काही दिवसांत या मुद्द्यावर आणखी प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिला नेतृत्वाचा सन्मान राखण्याची गरज सर्वच राजकीय पक्षांनी ओळखली पाहिजे, अशी भूमिकाही विविध स्तरांतून मांडली जात आहे.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *