ताज्या घडामोडीराजकीयशहर

पवार-पाचर्णे एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ; बाजार समिती निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष


“तर्डोबाची वाडीमध्ये पवार-पाचर्णे एकत्र; शिरूरच्या राजकारणात नव्या समीकरणांची जोरदार चर्चा”


शिरूर-चावडीराज न्युज नेटवर्क
शिरूर तालुक्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार अशोक पवार आणि दिवंगत आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या कुटुंबीयांमध्ये राजकीय जवळीक निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक २०२६-३१ च्या प्रचारादरम्यान तर्डोबाची वाडी येथे माजी आमदार अशोक पवार यांचे पाचर्णे कुटुंबीयांच्या वतीने जाहीर स्वागत करण्यात आले. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे.
दिवंगत आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात तर्डोबाची वाडी येथून झाली होती. तसेच दिवंगत बाबुराव पाचर्णे आणि दिवंगत रावसाहेब दादा पवार यांनी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून काम पाहिले असल्याने या संस्थेवर पवार आणि पाचर्णे या दोन्ही घराण्यांचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे.


यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, नितीन पाचर्णे, नगरसेवक जगदीश पाचर्णे, सरपंच तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलचा गावभेट दौरा आणि उत्साहपूर्ण बैठक मोठ्या जल्लोषात पार पडली. गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, शेतकरी बांधवांचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचा जोश हेच आमचे बळ असल्याचे मत व्यक्त करत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, विकासासाठी आणि सक्षम बाजार व्यवस्थेसाठी साथ देण्याचे आवाहन दोन्ही नेत्यांनी मतदारांना केले.

दरम्यान, महायुती शेतकरी विकास पॅनल आणि अशोक पवार यांच्या स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, ५ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, कृषी उत्पन्न बाजार समितीची ही निवडणूक केवळ संस्थेची सत्ता ठरवणारी नसून, आगामी काळातील शिरूर तालुक्याच्या राजकारणाची दिशा आणि नवीन राजकीय समीकरणे निश्चित करणारी ठरणार आहे. त्यामुळे पवार-पाचर्णे एकत्र आल्याने निर्माण झालेली ही राजकीय घडामोड तालुक्यात चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय ठरली आहे.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *