टेक्नॉलॉजीताज्या घडामोडीमहाराष्ट्रशहरशिक्षण-प्रशिक्षण

राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवीण भंडारी यांच्या पुढाकारातून शिरूरमध्ये व्यापारी मेळावा व्यापारी–पोलीस संवाद, सुरक्षा, सायबर गुन्हे व पार्किंग प्रश्नांवर सकारात्मक चर्चा


शिरूर – सुदर्शन दरेकर
अखिल एकता उद्योग व्यापार मंडळ संगठनच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवीण भंडारी यांच्या पुढाकाराने शिरूर येथे व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. व्यापारी वर्गाच्या समस्या, व्यापारी–पोलीस समन्वय, सायबर सुरक्षा, वाहतूक, पार्किंग तसेच व्यापाऱ्यांच्या हिताच्या विविध विषयांवर या मेळाव्यात सविस्तर चर्चा करण्यात आली.
शिरूर येथील सरदार पेठेतील ओम लाईट हाऊस येथे झालेल्या या मेळाव्यात शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी व्यापाऱ्यांना सायबर गुन्ह्यांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले. देशाच्या आर्थिक प्रगतीत व्यापारी वर्गाचे महत्त्वपूर्ण योगदान असून, बदलत्या काळात व्यापाऱ्यांनी ऑनलाइन व्यवहार करताना अधिक दक्षता घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. व्यापारी आणि पोलिसांमधील समन्वय अधिक बळकट करून व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
या मेळाव्यास पारनेरचे नायब तहसीलदार आकाश किसवे, कापड असोसिएशनचे निलेश पिपाडा, मामा धोंडगे, नगरसेवक राजेंद्र लोळगे, नगरसेवक उमेश शेळके, भाजपच्या रेश्मा शेख, भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. संपत लोखंडे, प्राचार्य डॉ. समीर ओंकार, विजय नरके, निलेश भळगट, महावीर कर्नावट, महेंद्रशेठ सुराणा, प्रा. रासकर यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.
राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवीण भंडारी यांनी व्यापारी समाज अधिक संघटित होणे, व्यापाऱ्यांचे प्रश्न शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे तसेच व्यापाऱ्यांना कायदेशीर व प्रशासकीय मार्गदर्शन मिळणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. व्यापारी संघटना ही केवळ व्यावसायिक हित जपणारी नसून समाजहित आणि राष्ट्रहित जपणारी संघटना असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी दानवीर भामाशाह यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. महाराणा प्रताप यांच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी संपूर्ण संपत्ती दान करून राष्ट्रसेवेचा आदर्श निर्माण करणाऱ्या भामाशाह यांच्या त्याग, राष्ट्रभक्ती आणि समाजसेवेच्या विचारांचे जतन करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.
मेळाव्यात व्यापारी वर्गासमोरील विविध समस्या, व्यापाऱ्यांशी संबंधित कायदे, सायबर सुरक्षेबाबत जनजागृती, बँकिंग व्यवहारातील दक्षता तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. उपस्थित व्यापाऱ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

प्रा. संपत लोखंडे यांनी शहरातील पार्किंगचा प्रश्न उपस्थित केला. नगरसेवक राजेंद्र लोळगे यांनी सराफ कट्टा परिसरात नियमित गस्ती पथक सुरू करण्याची मागणी केली. अतुल बोथरा, प्रकाश चोपडा, निलेश पिपाडा आणि राजेश शिंगवी यांनी व्यापारी वर्गाच्या विविध अडचणी मांडल्या. नगरसेवक उमेश शेळके यांनी वाहतूक, पार्किंग आणि मोकाट जनावरांच्या समस्यांवर नगरपालिका व पोलिसांची संयुक्त बैठक घेण्याची सूचना केली, तर व्यावसायिक बगाडे यांनी पार्किंगचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण भंडारी यांनी केले, तर नितीन भंडारी यांनी आभार मानले. व्यापारी हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी भविष्यातही अशा संवादात्मक मेळाव्यांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *