शिरूरमध्ये सराईत मोटारसायकल चोर जेरबंद; सहा चोरीचे गुन्हे उघडकीस डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई; आरोपीवर यापूर्वीही चार गुन्हे दाखल

शिरूर : सुदर्शन दरेकर
शिरूर शहर व परिसरात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने एका सराईत मोटारसायकल चोराला जेरबंद करून तब्बल सहा मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. कृष्णा उमेश आंतरकर (वय २६, रा. पाथर्डी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी शिरूर शहरातील बी.जे. कॉर्नर, विद्याधाम प्रशालेच्या कंपाउंडजवळ हॅन्डल लॉक करून पार्क केलेली स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच १२ एनजी ७५३९) चोरीला गेली होती. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मोटारसायकल चोरीचा तपास करताना डी.बी. पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेतला. आरोपी कृष्णा आंतरकर हा शिरूर बाजारपेठ परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने मोटारसायकल चोरीची कबुली दिली. त्यानंतर केलेल्या अधिक तपासात त्याने शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आणखी पाच मोटारसायकली चोरी केल्याचे समोर आले.
आरोपी कृष्णा आंतरकर याच्यावर यापूर्वीही बीड जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे चार गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीला ७ ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले आणि शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने केली.

संपादक : सुदर्शन दरेकर
