घोडनदी पुलावरून उडी मारलेल्या महिलेचा मृतदेह आढळला; ओळख पटली
:प्रतिनिधी
शिरूर शहरातील ऐतिहासिक सतरा कमानी पुलावरून घोडनदीच्या पात्रात उडी मारून आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह अखेर शोधण्यात आला आहे. दौलत शितोळे यांच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने अथक प्रयत्नांनंतर नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला. मृत महिलेची ओळखही पटली असून आशा दिलीप बोटकर (वय ४८, सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर; मूळ रा. पारगाव मंगळूर, ता. जुन्नर, जि. पुणे) असे त्यांचे नाव आहे.
६ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास आशा बोटकर या सतरा कमानी पुलावर काही वेळ येरझाऱ्या घालत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्या पुलावर बसल्या आणि अचानक घोडनदीच्या पात्रात उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर नदीपात्रात शोधमोहीम सुरू करण्यात आली होती.
दरम्यान, ८ ऑगस्ट रोजी सकाळी दौलत शितोळे यांच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने घोडनदीच्या पात्रात युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली. अथक प्रयत्नांनंतर महिलेचा मृतदेह पथकाच्या हाती लागला.
मृतदेहाजवळ सापडलेल्या पाकिटातील कागदपत्रे व छायाचित्राच्या आधारे महिलेची ओळख पटविण्यात आली. त्या कारेगाव, ता. शिरूर येथे वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, मृतदेह श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीत आढळून आल्याने या घटनेची नोंद बेलवंडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर व तपासाची कार्यवाही महिला पोलीस कॉन्स्टेबल शोभा काळे करीत आहेत.
आपत्ती व्यवस्थापन पथकाचे आवाहन
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने मदत घ्यावी. कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी संबंधित यंत्रणा किंवा आपत्ती व्यवस्थापन पथकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तात्काळ आपत्कालीन मदतीसाठी संपर्क :
📞 दौलत शितोळे आपत्ती व्यवस्थापन संघ – 96738 42120

संपादक : सुदर्शन दरेकर
