चार महिन्यांनंतर श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती मंदिर आजपासून भाविकांसाठी खुले; विकासकामांचा पहिला टप्पा पूर्ण

रांजणगाव :प्रतिनिधी
श्री महागणपती मंदिर येथे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागामार्फत सुरू असलेल्या जतन व संवर्धनाच्या विकासकामांचा पहिला टप्पा पूर्णत्वास आला असून, तब्बल साडेतीन महिन्यांनंतर शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ५.३० वाजल्यापासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे.
मंदिरातील जतन व संवर्धनाची विकासकामे हाती घेण्यासाठी दि. १५ एप्रिल ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. या कालावधीत नियोजित कामे पूर्ण झाल्याने आता भाविकांना पुन्हा श्री महागणपतींचे दर्शन घेता येणार आहे.
विश्वस्त मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, मंदिर व परिसरातील काही विकासकामे पुढील काळातही सुरू राहणार आहेत. मात्र, या कामांमुळे भाविकांच्या दर्शनात कोणताही अडथळा येणार नसून दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यात येणार आहे.
दि. १ ऑगस्ट २०२६ रोजीचे धार्मिक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत :
पहाटे ५.०० ते ५.३० : श्रींचा अभिषेक
पहाटे ५.३० : मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले
सकाळी ७.३० : सामूहिक आरती
सकाळी ७.३० ते १०.०० : गणेश याग
दुपारी १२.०० : महापूजा
सायंकाळी ७.३० : सामूहिक आरती
रात्री ९.४५ : शेजारती
मंदिर पुन्हा दर्शनासाठी खुले होत असल्याने अष्टविनायक भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान विश्वस्त मंडळाने भाविकांनी मंदिर प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेला सहकार्य करून शांततेत दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

संपादक : सुदर्शन दरेकर
