संजय पाचंगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला यश; महावितरणने मागणी मान्य करत कामांना गती

शिरूर : चावडीराज न्यूज
शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात संध्याकाळी ६ ते १० या वेळेत सुरू असलेल्या लोडशेडिंगमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होत असून, बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याच्या पार्श्वभूमीवर क्रांतिवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय शिवाजी पाचंगे यांनी महावितरणच्या केडगाव विभागाला निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता.
या निवेदनाची तातडीने दखल घेत महावितरणच्या केडगाव विभागाने पाचंगे यांना पत्राद्वारे कळविले आहे की, ज्या गावांचा, वाड्या-वस्त्यांचा RDSS प्रकल्पामध्ये समावेश आहे, त्या सर्व ठिकाणची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदार यांना देण्यात आल्या आहेत.
तसेच, सध्या AG Mix फिडरवर असलेल्या गावांना आवश्यक कामे पूर्ण झाल्यानंतर गावठाण फिडरवर जोडून तेथील वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचेही महावितरणने स्पष्ट केले आहे. यामुळे संध्याकाळच्या लोडशेडिंगच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महावितरणने सकारात्मक भूमिका घेत आवश्यक कार्यवाही सुरू केल्याने संजय पाचंगे यांची प्रमुख मागणी मान्य झाल्याचे स्पष्ट झाले असून, यानंतर त्यांनी नियोजित आंदोलन मागे घेण्याची अपेक्षा महावितरणने व्यक्त केली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देणारा हा निर्णय मानला जात असून, लवकरात लवकर कामे पूर्ण करून अखंडित वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

संपादक : सुदर्शन दरेकर
