हजारो कुटुंबांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दूध भेसळखोरांचा पर्दाफाश; उत्तर पुणे जिल्ह्यात मोठी कारवाई
पुणे , दि. ५ : चावडीराज न्युज नेटवर्क
राज्यातील सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा पुणे ग्रामीण

पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्या संयुक्त कारवाईत पर्दाफाश झाला आहे. या धडक कारवाईत तब्बल अडीच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १३ जणांना अटक करण्यात आली आहे. राज्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी दूध भेसळविरोधी कारवाई मानली जात आहे.
पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, सांगली आणि भिवंडी अशा सहा जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. मंचर येथील दोघांना अटक केल्यानंतर या संपूर्ण रॅकेटचे धागेदोरे उलगडले. गेल्या दोन वर्षांपासून हा काळा धंदा सुरू असल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे.
शाम्पू, दूध पावडर आणि केमिकलचे विषारी मिश्रण
तपासात उघड झालेली माहिती अधिकच धक्कादायक आहे. वास न येणारा शाम्पू, दूध पावडर आणि विविध रसायने पाण्यात मिसळून बनावट दूध तयार केले जात होते. ५०० लिटर शुद्ध दुधात ३०० लिटर तर १००० लिटर दुधात तब्बल ५०० लिटर केमिकलयुक्त पाणी मिसळले जात होते.
हे भेसळयुक्त दूध पुढे नामांकित डेअरी कंपन्यांकडे पुरवले जात असल्याचा संशय असून, त्यापासून विविध दुग्धजन्य पदार्थ तयार होऊन ते थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत होते. त्यामुळे लाखो नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याशी गंभीर प्रकारे खेळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
४५ अधिकाऱ्यांची संयुक्त कारवाई
या मोठ्या कारवाईसाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे २५ आणि अन्न व औषध प्रशासनाचे २० अधिकारी अशा एकूण ४५ अधिकाऱ्यांच्या पथकाने विशेष मोहीम राबवली. या रॅकेटमध्ये आणखी काही मोठ्या व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, त्या दिशेने सखोल तपास सुरू आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे राज्यभरातून कौतुक
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम उघडली असून विभागाचे आयुक्त **** यांच्या कठोर भूमिकेचे राज्यभरातून कौतुक होत आहे. भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेली ही मोहीम सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे.
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
तज्ज्ञांच्या मते, दूध खरेदी करताना अधिकृत आणि विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच दूध घेणे, दुधाच्या गुणवत्तेबाबत शंका आल्यास त्वरित अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करणे आणि भेसळयुक्त पदार्थांविषयी जागरूक राहणे आवश्यक आहे.
सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा भेसळखोरांविरोधात कठोर कारवाई करून त्यांना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी आता राज्यभरातून जोर धरत आहे.

संपादक : सुदर्शन दरेकर

