शिरूर बाह्यवळण मार्गावरील दुभाजक फोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल अज्ञात व्यक्तींविरोधात शिरूर पोलिसांची कारवाई; वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा आरोप

शिरूर : (प्रतिनिधी)
शिरूर बाह्यवळण मार्गावरील राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी असलेले सिमेंट काँक्रीटचे दुभाजक अज्ञात व्यक्तींनी फोडल्याने वाहतूक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, या प्रकारामुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर शहर व सरदवाडी परिसरातील कोळपे हॉस्पिटलसमोर, गंगा कार डेकोरसमोर, संग्राम हॉटेलसमोर, गणेश मंदिरासमोर बो-हाडे मळा तसेच सरदवाडी येथील महिंद्रा शोरूमसमोर व हिंदुस्तान पेट्रोल पंप परिसरात राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी असलेले काँक्रीटचे दुभाजक अज्ञात व्यक्तींनी तोडले आहेत.
दुभाजक तोडल्यामुळे महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असून, सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे वाहतुकीच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊन अपघात होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शेखर शिवाजी झाडबुके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा कलम ३ तसेच राष्ट्रीय महामार्ग कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार वाघमोडे करीत असून, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. दुभाजक तोडणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
शिरूर बाह्यवळण मार्गावरील दुभाजक तोडून वाहतुकीस धोका निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे.

संपादक : सुदर्शन दरेकर
