क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुकान फोडून १० इलेक्ट्रिक मोटार पंप चोरी करणारे तिघे जेरबंद; एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत


शिक्रापूर, दि. ३ :सुदर्शन दरेकर (चावडीराज न्युज )
रिपेअरिंगसाठी दुकानात ठेवण्यात आलेले सुमारे एक लाख रुपये किमतीचे १० इलेक्ट्रिक मोटार पंप चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याप्रकरणी रामदास आनंदराव सासवडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या दुकानाचे शटर उघडून आरोपींनी आत प्रवेश केला आणि दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेले १० इलेक्ट्रिक मोटार पंप संगनमताने चोरून नेले. तपासादरम्यान मुख्य आरोपी अजय हनुमंत जाधव याने साथीदार संतोष बालाजी लोहार आणि वैभव अशोक घुमरे यांच्या मदतीने चोरीचा कट रचल्याचे निष्पन्न झाले.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला. आरोपी सणसवाडी परिसरातील एल अँड टी फाट्याजवळ असल्याची माहिती डायल ११२ पथकाला मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने कारवाई करून अजय हनुमंत जाधव (वय २५), संतोष बालाजी लोहार (वय २४) आणि वैभव अशोक घुमरे (वय २१) या तिघांना ताब्यात घेतले.
२९ जून रोजी आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपींकडून चोरीस गेलेले सुमारे एक लाख रुपये किमतीचे १० इलेक्ट्रिक मोटार पंप जप्त करण्यात आले असून पुढील तपास पोलीस हवालदार आर. डी. मळेकर हे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक भोसले, पोलीस हवालदार मळेकर, नितीन सुद्रीक तसेच पोलीस शिपाई नागेश वाघमारे, विकास बांगर, संतोष बाबर, ललित चक्रनारायण आणि किरण बडे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *