क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जबरी चोरीनंतर महिलेचा अपघाती मृत्यू; आरोपीला 24 तासांत अटक करून पोलिसांनी दिला न्याय


रांजणगाव -चावडीराज न्यूज


कारेगाव परिसरात भंगार गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका महिलेची चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला रांजणगाव MIDC पोलिसांनी अवघ्या 24 तासांत अटक केली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार आणि चाकू जप्त करण्यात आला आहे.
दि. 27 जून 2026 रोजी रात्री कारेगाव परिसरात राहणारी संगिता परमेश्वर शिंदे (रा. ढवळगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) या शिरूरकडे जाण्यासाठी एका कारला हात दाखवून बसल्या होत्या. यावेळी कारमधील अनोळखी इसमाने त्यांना चाकूचा धाक दाखवत गळ्यातील व कानातील सुमारे 80 हजार रुपये किमतीचे आठ ग्रॅम सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले.
दरम्यान, शिरूर बायपास येथे उतरवल्यानंतर त्या एका ओळखीच्या व्यक्तीसोबत मोटारसायकलवरून गावी जात असताना त्यांच्या मोटारसायकलला टेम्पोची धडक बसून त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मात्र, अपघातापूर्वी त्यांनी आपल्यासोबत झालेल्या जबरी चोरीची माहिती फोनवरून मुलगा प्रभू शिंदे याला दिली होती.
या माहितीच्या आधारे रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक 312/2026, कलम 309(4) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने कारेगाव परिसर तसेच पुणे-नगर महामार्गावरील सुमारे 25 ते 30 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासादरम्यान विनोद अनिल जाधव (वय 36, रा. बाभुळस खुर्द, ता. शिरूर, जि. पुणे) याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी आरोपीला 30 जून रोजी रात्री अटक केली असून त्याला 6 जुलै 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी अपहरण, खून आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार कदम व रांजणगाव MIDC पोलीसांच्या पथकाने केली.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *