शिरूर बाजार समिती निवडणुकीत रंगत वाढली! १८ जागांसाठी ५२ उमेदवार रिंगणात; महायुतीचा पॅनल जाहीर
शिरूर, चावडीराज न्युज नेटवर्क

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बहुचर्चित निवडणुकीत अखेर चित्र स्पष्ट झाले असून १८ जागांसाठी ५२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी तब्बल २१४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता निवडणुकीची खरी लढत सुरू झाली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी हरिश्चंद्र कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, छाननीनंतर एकूण २६६ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत २१४ जणांनी माघार घेतल्याने आता ५२ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.
दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिरूर शहरात राजकीय घडामोडींना वेग आला होता. विविध पक्षांच्या बैठका, चर्चा, समन्वय आणि उमेदवारांच्या मनधरणीचे सत्र दिवसभर सुरू होते. अखेर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्र येत महायुतीचा पॅनल जाहीर केला.
आमदार ज्ञानेश्वर (माऊली) कटके, तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद तसेच शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बापू शिंदे यांनी संयुक्तपणे महायुतीची भूमिका स्पष्ट करत निवडणूक एकत्र लढविण्याची घोषणा केली.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि माजी आमदार अशोक पवार यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसल्याने पुढील काही दिवसांत राजकीय समीकरणांमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या बाजार समित्यांपैकी एक मानली जाते. शिरूर, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील हजारो शेतकरी या बाजार समितीशी संलग्न असून येथे मोठ्या प्रमाणावर कृषी मालाची उलाढाल होते. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
यंदा कोणत्याही गटाला बिनविरोध यश मिळाले नसून प्रत्येक जागेसाठी चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या काळात प्रचाराचा धुरळा उडणार असून बाजार समितीवरील सत्ता कोणाच्या हाती जाणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

ठळक मुद्दे
१८ जागांसाठी ५२ उमेदवार रिंगणात
२६६ पैकी २१४ उमेदवारांनी घेतली माघार
भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी (अजित पवार) महायुतीची घोषणा
शरद पवार गटाची भूमिका अद्याप अस्पष्ट
शिरूर, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यांचे लक्ष निवडणुकीकडे
बाजार समितीच्या सत्तेसाठी चुरशीची लढत निश्चित मानली जात आहे.

संपादक : सुदर्शन दरेकर

