ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीला मुंबई हायकोर्टाचा ब्रेक; ७८ ग्रामपंचायतींच्या मतदारांना डावलल्याने निवडणूक स्थगित!


शिरूर -सुदर्शन दरेकर (चावडीराज न्युज )
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा झटका देत प्रस्तावित निवडणूक प्रक्रिया स्थगित केली आहे. ७८ ग्रामपंचायतींच्या सुमारे ७१२ सदस्यांना अंतिम मतदार यादीतून वगळण्यात आल्याने निवडणूक प्रक्रियेची पवित्रता आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
मा. न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि मा. न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशात, महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या ४ फेब्रुवारी २०२६ च्या स्पष्ट निर्देशांचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे नमूद केले आहे.
न्यायालयाने म्हटले आहे की, १ फेब्रुवारी २०२६ या पात्रता दिनांकाच्या आधारे मतदार यादी तयार करणे बंधनकारक असताना, ७८ ग्रामपंचायतींच्या सदस्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. परिणामी, अपेक्षित ९१८ मतदारांऐवजी केवळ २०६ मतदारांची यादी तयार करण्यात आली.
न्यायालयाने या कृतीला मनमानी स्वरूपाची ठरवत, अशा दोषपूर्ण मतदार यादीच्या आधारे होणारी निवडणूक स्वतंत्र, निष्पक्ष आणि कायदेशीर ठरू शकत नसल्याचे स्पष्ट केले. ५ जुलै २०२६ रोजी प्रस्तावित असलेली निवडणूक या परिस्थितीत घेता येणार नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
खंडपीठाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना नव्याने आणि कायदेशीर पद्धतीने मतदार यादी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नवीन मतदार यादी तयार झाल्यानंतरच नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
न्यायालयाच्या आदेशातील महत्त्वाचे मुद्दे :
१ फेब्रुवारी २०२६ या पात्रता दिनांकाच्या आधारे मतदार यादी तयार करण्याचे स्पष्ट निर्देश होते.
७८ ग्रामपंचायतींच्या सुमारे ७१२ सदस्यांना मतदार यादीतून वगळण्यात आले.
अपेक्षित ९१८ मतदारांऐवजी केवळ २०६ मतदारांची अंतिम यादी तयार करण्यात आली.
जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक प्राधिकरणाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाचे निरीक्षण.
दोषपूर्ण मतदार यादीच्या आधारे निवडणूक घेणे अन्यायकारक आणि बेकायदेशीर ठरेल.
नव्याने मतदार यादी तयार करूनच नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश.
या निर्णयामुळे शिरूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आगामी निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक आता नव्याने जाहीर करावे लागणार आहे.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *