उद्योगराजकीयशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

रस्त्यावर प्रसूती करून देवदूत ठरलेल्या डॉ. सुनिता पोटे यांना ‘शिवशाही महारत्न पुरस्कार’


“पंढरपूर येथे शिवशाही न्यूज नेटवर्कच्या वर्धापन दिन सोहळ्यात आरोग्य व समाजसेवेचा गौरव; मान्यवरांच्या हस्ते सन्मान”
प्रतिनिधी :सुदर्शन दरेकर
शिवशाही न्यूज नेटवर्कच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर येथील श्रीराम मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘शिवशाही महारत्न पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शिरूर नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा विद्युत व पाणीपुरवठा सभापती डॉ. सुनिता संतोष पोटे यांना आरोग्य व समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘शिवशाही महारत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पदक विजेत्या ज्येष्ठ भारूड सम्राज्ञी चंदाताई तिवारी या होत्या, तर कार्यक्रमाचे उद्घाटन पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, पंढरपूरच्या नगराध्यक्ष डॉ. प्रणिता भालके, माजी जिल्हा परिषद सदस्या ऋतुजाताई मोरे, मनसे नेते दिलीप धोत्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे, आम्ही शिरूरकर फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र बापू सानप, मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महेबूब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, उद्योजक राजेंद्र खेतमाळीस, गोपी शेठ पठारे तसेच शिवशाही न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक सचिन कुलकर्णी, कार्यकारी संपादक मनिषा कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सुनिता पोटे यांनी वैद्यकीय व्यवसायाला समाजसेवेचे माध्यम मानत अनेक गरजू रुग्णांना अल्पदरात तसेच मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. नगरसेविका आणि सभापती म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली आहे.
काही दिवसांपूर्वी रस्त्यावर प्रसूती वेदनेने विव्हळलेल्या एका गरजू महिलेच्या मदतीसाठी धाव घेत त्यांनी कोणतीही अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा नसताना धैर्याने आणि कौशल्याने सुरक्षित प्रसूती करून आई व बाळाचे प्राण वाचवले होते. त्यांच्या या संवेदनशील आणि मानवतावादी कार्याचे राज्यभरातून कौतुक झाले होते.
याच उल्लेखनीय वैद्यकीय आणि सामाजिक योगदानाची दखल घेत शिवशाही न्यूज नेटवर्कतर्फे त्यांना ‘शिवशाही महारत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी, “डॉ. सुनिता पोटे यांनी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांच्या हितासाठी करत महिला डॉक्टरही राजकारणात यशस्वी नेतृत्व करू शकते, हे सिद्ध केले आहे. त्यामुळे त्या या पुरस्कारासाठी खऱ्या अर्थाने पात्र आहेत,” असे गौरवोद्गार काढले.
आमदार समाधान आवताडे यांनीही, “रस्त्यावर यशस्वी प्रसूती करून डॉ. सुनिता पोटे यांनी जनतेप्रती असलेली आपुलकी आणि बांधिलकीचे सर्वोच्च उदाहरण घालून दिले आहे. त्यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या कार्याची योग्य पोचपावती असून पंढरपूरच्या भूमीत हा सन्मान होत असल्याचा मला अभिमान आहे,” असे सांगितले.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *