ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशहर

शिरूर बाह्यवळण मार्गावरील अपघात रोखण्यासाठी वाळुंज यांचे मुंडन आंदोलन; तहसील कार्यालयाला ठोकले टाळे


शिरूर : प्रतिनिधी
पुणे–अहिल्यानगर मार्गावरील शिरूर बाह्यवळण रस्त्यावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अपघात रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी वाळुंज यांनी शिरूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत मुंडन आंदोलन केले तसेच तहसील कार्यालयास टाळे ठोकून शासनाचे लक्ष वेधले.
शिरूर शहर तसेच उपनगरांची वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि पुणे–अहिल्यानगर मार्गावरील वाढते वाहतूक दळणवळण यामुळे शिरूर बाह्यवळण मार्गावरील अनेक ठिकाणे अपघातप्रवण बनली आहेत. या धोकादायक ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवर सर्व्हिस रोड उभारण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी वाळुंज यांनी केली आहे.
बाह्यवळण मार्गालगत असलेल्या वस्त्या, व्यावसायिक आस्थापना आणि उपनगरांमध्ये जाणाऱ्या नागरिकांना मुख्य महामार्गावरूनच ये-जा करावी लागत असल्याने अपघाताचा धोका वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठिकाणांची पाहणी करून त्या ठिकाणी सर्व्हिस रोड, योग्य दिशादर्शक फलक, प्रकाश व्यवस्था, वाहतूक नियंत्रणाची साधने तसेच आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
“नागरिकांच्या जीवितापेक्षा कोणतीही बाब मोठी नाही. अपघातांची मालिका थांबविण्यासाठी प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी,” अशी भूमिका निलेश वाळुंज यांनी घेतली.
शिरूर बाह्यवळण मार्गावरील अपघातांचा प्रश्न गंभीर बनत असताना प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन सर्व संबंधित विभागांची बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करणार का, याकडे शिरूरकरांचे लक्ष लागले आहे.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *