ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशहर

शिरूर-पुणे रस्त्यावरील वाढत्या अपघातांवर तहसीलदारांकडून बैठक क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांच्या पत्राची शिरूरच्या तहसीलदारांकडून दखल


शिरूर, (प्रतिनिधी )
पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील शिरूर परिसरात वाढत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तसेच शिरूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी तहसीलदार शिरूर यांनी महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय शिवाजी पाचंगे यांनी १७ ऑगस्ट रोजी दिलेल्या अर्जाची दखल घेत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता तहसील कार्यालय, शिरूर येथे ही बैठक होणार आहे. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक माहिती व कागदपत्रांसह बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील पाषाण मळा ते सतरा कमानी पूल या मार्गावर दोन्ही बाजूंना आराखड्यानुसार ७.५ मीटर रुंदीचे सर्व्हिस रस्ते प्रस्तावित असतानाही त्यांची निर्मिती झालेली नाही. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीचा ताण वाढून अपघातांची शक्यता निर्माण होत असल्याचा मुद्दा संजय पाचंगे यांनी आपल्या अर्जातून उपस्थित केला आहे.
तसेच रस्त्यावरील दुभाजक तोडून अनधिकृतपणे तयार करण्यात आलेले मार्ग, अशास्त्रीय पद्धतीने उभारलेले स्पीडब्रेकर, साईडपट्ट्यांची दुरवस्था, सर्व्हिस रस्त्यांचा अभाव, चौकांमध्ये ब्लिंकर व बॅरिकेडची कमतरता आणि ट्रॅफिक वॉर्डनची अनुपलब्धता यामुळे वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.
शिरूर शहरातील अंतर्गत वाहतुकीचाही प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. नगरपरिषदेच्या मंजूर आराखड्यानुसार रस्ते उपलब्ध नसणे, शहरात ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्त्यांची कमतरता, शिक्षण संस्था व सरकारी कार्यालयांमध्ये पुरेशा पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्त्यांवर होणारे पार्किंग आदी कारणांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या वाढत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
“जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये; अपघात रोखण्यासाठी संबंधित विभागांनी वेळीच ठोस उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी संजय पाचंगे यांनी केली आहे.
तहसीलदारांनी या पत्राची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांची बैठक बोलावल्याने आता शिरूर-पुणे रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी कोणत्या ठोस उपाययोजना केल्या जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत सर्व्हिस रस्ते, दुभाजक, स्पीडब्रेकर, पार्किंग, वाहतूक नियमन तसेच शहरातील रस्त्यांचे नियोजन याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *