ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशहर

झोपडपट्टी व अतिक्रमणातील घरे नियमित करून नागरिकांना सनद द्यावी : ॲड. स्वप्नील माळवे


शिरूर : (प्रतिनिधी )
शिरूर शहरातील झोपडपट्ट्या तसेच अतिक्रमणातील जागा शासनाच्या नियमानुसार करून संबंधित नागरिकांच्या नावे करण्यात याव्यात आणि त्यांना सनद देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील माळवे यांनी शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पाटील यांच्याकडे केली आहे.
याबाबत ॲड. माळवे यांनी यापूर्वी ९ एप्रिल २०२६ रोजी नगरपरिषदेसह संबंधित कार्यालयांकडे पत्रव्यवहार केला होता. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर प्रशासन अधिकारी तथा सहआयुक्त घोलप यांनी २० जुलै २०२६ रोजी नगरपरिषदेला अहवाल सादर करून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अद्याप कार्यवाही न झाल्याची खंत माळवे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, २७ ऑगस्ट रोजी त्यांनी पुन्हा मुख्याधिकाऱ्यांना स्मरणपत्र देत सात दिवसांत कार्यवाही न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तसेच हा विषय तातडीने सर्वसाधारण सभेत मांडून ठराव मंजूर करण्याची मागणीही त्यांनी केली.
सन २००० पूर्वीपासून अतिक्रमण असलेल्या नागरिकांनी ओळखपत्र, रेशनकार्ड, वीजबिल, नगरपरिषदेच्या करपावत्या, प्रतिज्ञापत्र व इतर उपलब्ध कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन ॲड. स्वप्नील माळवे यांनी केले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या हक्काच्या घरासाठी पुढे यावे, असेही त्यांनी सांगितले.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *