शिरूरमध्ये एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; १२.२० लाखांचा मुद्देमाल जप्त ५७ ग्रॅम मेफेड्रोनसह दोघे ताब्यात; तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू
शिरूर, : (प्रतिनिधी )
शिरूर शहर व तालुक्यात अमली पदार्थांच्या वाढत्या विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून, न्हावरा येथे स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत ५७ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थासह एकूण १२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, अमली पदार्थ पुरवठा केल्याचा आरोप असलेल्या तिसऱ्या आरोपीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३३ वाजता न्हावरा ते तळेगाव ढमढेरे रोडवरील शेळके वस्ती परिसरात, दत्ता नलगे यांच्या शेताजवळ ही कारवाई करण्यात आली. प्रदीप विठ्ठल कोरेकर (वय २४, रा. न्हावरा) आणि साईनाथ जनार्धन भोसीकर (वय २३, रा. कारेगाव) हे दोघे एमडी विक्रीसाठी जवळ बाळगत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत आढळून आले.
दोघांकडून ३२ ग्रॅम व २५ ग्रॅम असे एकूण ५७ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार त्याची किंमत ११ लाख ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
याशिवाय आरोपींकडून दोन महागडे मोबाईल फोन आणि नंबर प्लेट नसलेली होंडा शाईन मोटारसायकल असा सुमारे ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे या कारवाईत जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १२ लाख २० हजार रुपये आहे.
जप्त करण्यात आलेला अमली पदार्थ कोठून आणला, याबाबत पोलिसांनी दोन्ही आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी हा माल ज्ञानेश उर्फ माऊली काळुराम कोरेकर (रा. न्हावरा) याच्याकडून आणल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २१(क), २२(क), २९ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे आव्हान
शिरूर शहरासह तालुक्यात अमली पदार्थांची विक्री व सेवन हा चिंतेचा विषय बनत असून, अनेक तरुण अमली पदार्थांच्या आहारी जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अशा कारवायांना अधिक गती दिली जात असल्याचे दिसून येत आहे. अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या साखळीचा शोध घेऊन त्याच्या मुळावर घाव घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
शिरूर परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाईचा पवित्रा घेतल्याने ‘शिरूर पोलीस ॲक्शन मोडवर’ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, केवळ विक्रेत्यांवर कारवाई न करता अमली पदार्थांचा मूळ पुरवठादार, वितरणाची साखळी आणि त्यामागील नेटवर्क शोधणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत. दाखल अंमलदार म्हणून पोलीस हवालदार शिंदे यांनी काम पाहिले असून फिर्यादी पोलीस हवालदार जनार्धन सुरेश शेळके स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण आहेत.

संपादक : सुदर्शन दरेकर
