डाय ॲल्युमिनियम कंपनीतील HR मॅनेजरला धमकी; रांजणगाव औद्योगिक वसाहती मधील घटना
शिरूर : (प्रतिनिधी) : रांजणगाव गणपती येथील डाय ॲल्युमिनियम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे HR मॅनेजर हरीश मधुकर पाटील (वय ४८) यांना अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सॲपवर जीवे मारण्याची तसेच त्यांच्या मुलांच्या जीवाला धोका असल्याची धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
३० जुलै रोजी पाटील पुण्याकडे जात असताना त्यांच्या मोबाईलवर ‘रांजणगाव MIDCमधील तुझे दिवस संपले आहेत’ तसेच ‘तुझ्या मुलांचे आयुष्य संपवू’ अशा आशयाचे धमकीचे संदेश आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर ‘आजची रात्र तुझी शेवटची रात्र आहे’, असा संदेशही आल्याचे सांगण्यात आले.
३१ जुलै रोजी अन्य क्रमांकावरून फोन करून पाटील यांचा पत्ता, कंपनीचे नाव आणि कंपनीच्या MDची माहिती विचारण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून प्राथमिक नोंद करण्यात आल्याची माहिती आहे.
या घटनेमुळे रांजणगाव MIDCतील अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. धमकीमागील नेमके कारण, धमकी देणारी व्यक्ती कोण आणि तिचा औद्योगिक क्षेत्राशी काही संबंध आहे का, याचा तपास होणे गरजेचे आहे. औद्योगिक परिसरातील पोलिस गस्त व सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची मागणी होत आहे.

संपादक : सुदर्शन दरेकर
