शिरूर बायपासवरील अपघात रोखण्यासाठी पुलाखालील रस्ता खुला करा- संजय पाचंगे यांची मागणी

क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांचे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे निवेदन
शिरूर :(प्रतिनिधी )
पुणे–शिरूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफवरील शिरूर बायपास परिसरात वारंवार होणारे भीषण अपघात रोखण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिरूर बायपास परिसरात सातत्याने अपघात होत असून, अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरक्षित करण्यासाठी उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बायपासवरील एका पुलाखालून सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने या मार्गावर पाणी साचते आणि रस्ता वाहतुकीसाठी बंद होतो. त्यामुळे हा पर्यायी मार्ग वापरात येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पुलाखालील रस्त्याची किरकोळ दुरुस्ती करून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था केल्यास हा मार्ग पुन्हा वाहतुकीस खुला होऊ शकतो. विशेषतः दुचाकीस्वारांना मुख्य बायपासवरून जाण्याची गरज न पडता पुलाखालून सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येईल. त्यामुळे मुख्य मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते.

सदर ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून परिस्थितीची पाहणी करावी आणि किरकोळ दुरुस्तीची कामे तातडीने करून पुलाखालील रस्ता वाहतुकीस खुला करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी संजय पाचंगे यांनी केली आहे.
शिरूर बायपासवरील वाढते अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता संबंधित विभागाने केवळ कागदी कार्यवाही न करता तातडीने प्रत्यक्ष उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

संपादक : सुदर्शन दरेकर
