लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारकासाठी दादाभाऊ लोखंडे यांचे उपोषण स्थगित; प्रशासनाकडून पाठपुराव्याचे आश्वासन
“चौथ्या दिवशी रस्ता रोको आंदोलनानंतर तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांची भेट; शासकीय स्तरावर कार्यवाहीचे आश्वासन”
शिरूर, प्रतिनिधी :सुदर्शन दरेकर
शिरूर शहरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक व स्वागत कमान उभारण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी लहुजी शक्ती सेना, पुणे जिल्हा कोर कमिटीचे अध्यक्ष दादाभाऊ लोखंडे यांनी सुरू केलेले आमरण उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर गुरुवारी तात्पुरते स्थगित करण्यात आले.
दादाभाऊ लोखंडे यांनी आण्णाभाऊ साठे स्मारकाच्या मागणीसाठी दुसऱ्यांदा उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या चौथ्या दिवशी लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांसह महिलांनी मुख्य पुणे–नगर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.

या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार बाळासाहेब म्हस्के आणि शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत दादाभाऊ लोखंडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिरूर शहरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक व स्वागत कमान उभारण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक प्रस्ताव पाठवून योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल तसेच नियमानुसार आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.
प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर दादाभाऊ लोखंडे यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा केली.
यावेळी लहुजी शक्ती सेनेचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच नगरसेवक उमेश शेळके,नगरसेविका स्वाती साठे, चेतन साठे,तुकाराम खोले आणि नगरसेवक सागर नरवडे डॉ संतोष पोटे यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन दादाभाऊ लोखंडे यांना पाठिंबा दर्शविला व स्मारक उभारणीसाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे शिरूर शहरात भव्य स्मारक उभारण्याच्या मागणीला आता प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने संबंधित समाजबांधव व लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

संपादक : सुदर्शन दरेकर


