प्रात्यक्षिकांतून भौतिकशास्त्राचा अनुभवाधारित नवा अध्याय! सी. टी. बोरा महाविद्यालयात भौतिकशास्त्र प्रात्यक्षिक पुनर्रचना कार्यशाळा; ३७ प्राध्यापकांचा सहभाग

शिरूर, 🙁 प्रतिनिधी )
“करून शिकणे, अनुभवातून समजून घेणे आणि विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे” या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळ आणि सी. टी. बोरा महाविद्यालय, शिरूर (घोडनदी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टी. वाय. बी. एस्सी. भौतिकशास्त्र प्रात्यक्षिक पुनर्रचना व हँड्स-ऑन ट्रेनिंग’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील महाविद्यालयांमधील ३७ प्राध्यापकांनी कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यशाळेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तथा सहयोगी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थीकेंद्रित, गुणवत्तापूर्ण आणि काळानुरूप अभ्यासक्रम विकसित करण्याची गरज अधोरेखित केली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याबरोबरच प्रयोगशीलतेला चालना देणारे शिक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी प्रयोगशाळा ही केवळ उपकरणांची जागा नसून विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला दिशा देणारी प्रयोगभूमी असल्याचे सांगितले. सुसज्ज प्रयोगशाळा, इंटरॲक्टिव्ह स्टाफ, अनुभवाधारित अध्यापन आणि प्रात्यक्षिके प्रभावीपणे घेण्याच्या पद्धती याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. शिवाजी भोसले आणि डॉ. रमेश भिसे यांनीही विविध प्रयोग, अध्यापन पद्धती आणि प्रात्यक्षिकांची परिणामकारकता याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे प्रमुख वैशिष्ट्य ‘हँड्स-ऑन ट्रेनिंग’ हे ठरले. सहभागी प्राध्यापकांनी केवळ प्रयोगांचे प्रात्यक्षिक न पाहता स्वतः प्रयोग करून त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यामुळे ‘पाहणे–करून पाहणे–समजून घेणे–विद्यार्थ्यांना शिकवणे’ या अनुभवाधारित शिक्षणपद्धतीचा प्रभावी प्रत्यय सहभागी प्राध्यापकांना आला.
डॉ. दत्तात्रय बोबडे, डॉ. सिद्धार्थ कांबळे, डॉ. सुभाष पांढरकर आणि सहकाऱ्यांनी २० हून अधिक नाविन्यपूर्ण प्रयोगांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. प्रयोगांची कार्यपद्धती, निरीक्षणे, अचूकता, संकल्पनात्मक मांडणी तसेच विद्यार्थ्यांच्या अध्यापन-अधिगम प्रक्रियेत प्रयोगांचा प्रभावी वापर यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या कार्यशाळेमुळे प्राध्यापकांना आधुनिक प्रयोगशाळा कौशल्ये, प्रयोगाधारित अध्यापन आणि संकल्पनात्मक स्पष्टता यांचा समन्वय साधण्याची संधी मिळाली. त्यामुळे भौतिकशास्त्राचे शिक्षण अधिक रंजक, प्रयोगशील, विद्यार्थी-केंद्रित आणि परिणामकारक करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले.
कार्यशाळेचे समन्वयक डॉ. दत्तात्रय बोबडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. चैताली खेडकर यांनी केले, तर डॉ. एस. पी. कांबळे यांनी आभार मानले. कार्यशाळेचे उत्कृष्ट नियोजन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांचे सादरीकरण याबद्दल सहभागी प्राध्यापकांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
‘प्रयोगशाळेतून ज्ञान, अनुभवातून कौशल्य आणि कौशल्यातून उत्कृष्ट अध्यापन’ असा संदेश देणारी ही कार्यशाळा भौतिकशास्त्राच्या प्रात्यक्षिक अध्यापनाला नवी दिशा देणारी ठरली.

संपादक : सुदर्शन दरेकर
