शिरूर शहरातील अंगणवाडी पोषण आहारात निकृष्टपणा व अस्वच्छतेचा आरोप; कारवाईची डॉ. सुनिता पोटे यांची मागणी
शिरूर प्रतिनिधी – चावडीराज न्युज
शिरूर शहरातील नगर परिषद अंगणवाड्यांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सभापती डॉ. सुनिता पोटे यांनी तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात डॉ. पोटे यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात अंगणवाडीतील पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असून तो अत्यंत अस्वच्छ वातावरणात तयार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, पोषण आहार तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी स्वच्छ धुतली जात नसून ती अस्वच्छ अवस्थेत पडलेली असतात. आहार तयार करण्याची जागाही अत्यंत अस्वच्छ असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवले जात असल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
डॉ. पोटे यांनी पुढे म्हटले आहे की, संबंधित ठिकाणी शौचालय, स्नानगृह व पाण्याची व्यवस्था अस्वच्छ होती. काही खाद्यपदार्थ उंदरांनी कुरतडल्याचेही आढळून आले. मुलांना देण्यात येणारी बिस्किटेही अस्ताव्यस्त अवस्थेत ठेवण्यात आली होती. याशिवाय अन्नपदार्थ तयार करण्याच्या परिसरात रंगाचे डबे ठेवण्यात आल्याचेही निदर्शनास आले.
निवेदनात एकाच व्यक्तीकडून सर्व कामे केली जात असल्याचा उल्लेख करण्यात आला असून या संपूर्ण प्रकाराची माहिती संबंधित ठेकेदार तसेच नगराध्यक्ष यांनाही देण्यात आल्याचे डॉ. पोटे यांनी म्हटले आहे.
अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत संवेदनशील असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉ. सुनिता पोटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

संपादक : सुदर्शन दरेकर

