ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशहर

वाघोली व रांजणगाव महावितरण उपविभाग प्रस्तावाला गती; आमदार ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांनी संचालक राजेंद्र पवार यांची घेतली भेट


शिरूर -सुदर्शन दरेकर
शिरूर-हवेली मतदारसंघातील वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे नागरीकरण आणि औद्योगिक विस्तार लक्षात घेता वाघोली व रांजणगाव येथे स्वतंत्र महावितरण उपविभाग (Sub-Division) सुरू करण्याच्या प्रस्तावाला गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. यासाठी शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांनी महाराष्ट्र राज्य महावितरणचे संचालक मा. राजेंद्रजी पवार यांची मुंबई येथील प्रकाशगड कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान आमदार कटके यांनी वाघोली व रांजणगाव उपविभाग स्थापनेचा प्रस्ताव तातडीने मंजूर करून कार्यवाही सुरू करण्याची मागणी करणारे निवेदन संचालक पवार यांना सादर केले. या प्रस्तावासंदर्भात सविस्तर चर्चा झाली असून, संबंधित प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
आमदार कटके यांनी निवेदनात नमूद केले की, वाघोली परिसरात मोठ्या प्रमाणावर निवासी व व्यावसायिक वसाहती विकसित होत असून रांजणगाव एमआयडीसीमुळे औद्योगिक वीज वापरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सध्याच्या प्रशासकीय व्यवस्थेवर ताण येत असून ग्राहकांना विविध सेवांसाठी विलंबाचा सामना करावा लागत आहे.
स्वतंत्र उपविभाग कार्यान्वित झाल्यास वीजपुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे तातडीने निराकरण, नवीन वीजजोडणी, देखभाल-दुरुस्ती, बिलिंग सेवा आणि आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसाद अधिक वेगाने देता येईल. तसेच नागरिक, शेतकरी, उद्योग आणि व्यापारी वर्गाला अधिक कार्यक्षम व दर्जेदार सेवा उपलब्ध होणार असल्याचे आमदार कटके यांनी सांगितले.
संचालक राजेंद्र पवार यांनीही या मागणीची दखल घेत संबंधित प्रस्तावावर सकारात्मक चर्चा केली असून, आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून प्रस्तावाला गती देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिल्याचे आमदार कटके यांनी सांगितले.
शिरूर-हवेली मतदारसंघाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने वाघोली व रांजणगाव येथे स्वतंत्र महावितरण उपविभाग सुरू करण्याची मागणी महत्त्वाची मानली जात असून, या प्रस्तावाला लवकरच अंतिम मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *