जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शिरूरमध्ये जनजागृती रॅली; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
- शिरूर, दि. ३० :चावडीराज न्युज नेटवर्क

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने मंगळवारी शिरूर शहरात अमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत सुमारे १०० ते १२० विद्यार्थ्यांसह शिरूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.

सदर जनजागृती रॅलीची सुरुवात विद्याधाम शाळा, शिरूर येथून करण्यात आली. रॅलीचा मार्ग विद्याधाम शाळा, इंदिरा गांधी पुतळा, बस स्टँड, जैन मंदिर, पाच कंदील चौक, राम आळी, बीजे कॉर्नर असा असून पुन्हा विद्याधाम शाळेत रॅलीचा समारोप करण्यात आला.
रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम दर्शविणारे फलक हातात घेऊन घोषणाबाजी करत नागरिकांमध्ये जनजागृती केली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शहरात अमली पदार्थांविरोधात सकारात्मक संदेश पोहोचला.
रॅलीनंतर विद्याधाम शाळेत आयोजित कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य तसेच शिरूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर दुष्परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून दूर राहून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा आणि समाजात जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
सदर कार्यक्रम शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला असून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये अमली पदार्थांविषयी जागरूकता निर्माण करण्यास मोठी मदत झाली.

संपादक : सुदर्शन दरेकर

