ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशहर

शिरूर बाजार समितीच्या रणधुमाळीत राजकीय समीकरणे बदलणार? माऊली आबा कटके विरुद्ध अशोक पवार यांची प्रतिष्ठा पणाला; राहुल पाचर्णे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष


शिरूर, प्रतिनिधी :चावडीराज न्युज नेटवर्क
पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेची समजली जाणारी निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, या निवडणुकीने संपूर्ण तालुक्याचे राजकीय वातावरण तापवले आहे. येत्या ५ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीत आमदार ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके आणि माजी आमदार अशोक पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने या निवडणुकीकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडताना आमदार माऊली आबा कटके यांनी, “अशोक पवार हे नेमके कोणत्या पक्षात आहेत, हे त्यांनाच विचारा,” असे विधान केल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापले असून विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.


दुसरीकडे, स्वर्गीय आमदार बाबुराव पाचर्णे यांचे चिरंजीव राहुल पाचर्णे, दिलीप हिंगे, जयश्री पलांडे यांच्यासह अनेक निष्ठावान भाजप पदाधिकाऱ्यांना महायुतीकडून पुन्हा उमेदवारी न मिळाल्याने नाराजी असल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे. या नाराजीचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलने गावभेट दौऱ्याला वेग दिला असून सोनेसांगवी आणि निमगाव भोगी येथे उत्साहपूर्ण बैठका पार पडल्या. शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विश्वास आणि आशीर्वाद मिळत असल्याचा दावा पॅनलकडून करण्यात येत आहे.


दरम्यान, माजी आमदार अशोक पवार आणि राहुल पाचर्णे यांनी प्रचारासाठी संपूर्ण तालुका पिंजून काढला असून, गावोगावी सभा, बैठका आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून वातावरण निर्मिती करण्यावर भर दिला आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, यंदाच्या शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता असून काही धक्कादायक निकालही समोर येऊ शकतात. त्यामुळे शिरूर तालुक्यातील या महत्त्वाच्या संस्थेवर अखेर कोणाची सत्ता येणार, याकडे केवळ तालुक्याच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सुरू झालेली निवडणूक आता प्रतिष्ठेच्या लढाईत!
पक्षनिष्ठा, नाराज नेते, बदलती राजकीय समीकरणे आणि शेतकरी मतदारांचा कौल यामुळे यंदाची शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अत्यंत रंगतदार ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *