क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रशहर

शिरूर बायपास बनतोय ‘मृत्यूचा सापळा’! चार वाहनांच्या विचित्र अपघातात वाडेगव्हाण गावचे तरुण उद्योजक किशोर यादव यांचा दुर्दैवी अंत,


शिरूर, दि. १२: सुदर्शन दरेकर
शिरूर बाह्यमार्गावरील हॉटेल ‘संग्राम’जवळ मंगळवारी सायंकाळी चार वाहनांचा विचित्र आणि भीषण अपघात झाला. यू-टर्न घेणाऱ्या कार व दुचाकीला पाठीमागून कंटेनरने जोरदार धडक दिल्यानंतर कार बसवर आदळली. या अपघातात कारचालकासह दुचाकीस्वार अशा दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून पसार झाला.
किशोर नामदेव यादव (वय ३८, रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर) आणि प्रथमेश प्रकाश लाड (वय ३०, रा. पलूस-कुंडल, जि. सांगली) अशी मृतांची नावे आहेत. किशोर यादव हे वाडेगव्हाणच्या सरपंच प्रियांका यादव यांचे पती होते. प्रथमेश लाड हे आयटी कंपनीत कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर बायपासवरील डिव्हायडरजवळ यू-टर्न घेण्यासाठी दुचाकीस्वार थांबला होता. त्याच्यामागे कार यू-टर्न घेत असताना पाठीमागून आलेल्या कंटेनरने कारला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे कार पुढे जाऊन पुणे-नगर मार्गावरील बसला धडकली. या विचित्र अपघातात दुचाकीस्वार प्रथमेश लाड यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या कारचालक किशोर यादव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


अपघातानंतर काही काळ पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या कंटेनरचालकाचा शोध सुरू आहे.
बायपास की मृत्यूचा सापळा? नागरिकांचा संतप्त सवाल
शिरूर शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, वाढलेली वाहनांची वर्दळ आणि पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील सातत्याने वाढणारी वाहतूक यामुळे शिरूर बायपासचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
शिरूर बायपासवरील डिव्हायडर, यू-टर्न आणि वाहतुकीच्या नियोजनाचा प्रश्न यापूर्वीही सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. मात्र, अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
शिरूर बायपासवर उड्डाणपुलाची गरज
शिरूर शहराचा वाढता विस्तार आणि भविष्यातील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता, शिरूर बायपासवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी उड्डाणपूल किंवा अन्य कायमस्वरूपी वाहतूक व्यवस्थेचा पर्याय गांभीर्याने विचारात घेण्याची गरज आहे. आगामी पुणे-अहिल्यानगर रस्त्याच्या आराखड्यात शिरूर बायपासवरील उड्डाणपुलाचा समावेश करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने ठोस प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *