एकल महिलांचे दुःख दूर करण्यासाठी समाज व सरकारने संवेदनशीलपणे पुढे यावे : हेरंब कुलकर्णी”

शिरूर,सुदर्शन दरेकर
दि. २३ जून : शिरूर नगरपरिषदेच्या महिला व बालविकास विभागामार्फत आयोजित करण्यात आलेला ‘एकल महिला दिन’ कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमात शिरूर शहरातील मोठ्या संख्येने एकल महिलांनी सहभाग घेत शासनाच्या विविध योजना, स्वयंरोजगार, स्वावलंबन आणि महिला सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित महिलांचे हळदी-कुंकू व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्या अभिजित पाचर्णे, मुख्याधिकारी श्री. प्रितम पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. आयेशा कलिम सय्यद, उपसभापती सौ. स्वप्नाली जामदार, संजय गांधी निराधार योजना नायब तहसीलदार सुवर्णा खरमाटे, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, प्रत्युष कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल बिरादार तसेच विविध समित्यांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.
वक्त्यांनी एकल महिलांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत महिलांनी संघटित होऊन आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम बनण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्या पाचर्णे यांनी एकल महिलांच्या सन्मान व सक्षमीकरणासाठी शिरूर नगरपरिषद सदैव कटिबद्ध राहील, अशी ग्वाही दिली.
‘एकल महिला सशक्त तर समाज सक्षम’ आणि ‘स्वाभिमान, समानता आणि सन्मान – प्रत्येक एकल महिलेचा अधिकार’ या घोषणांनी कार्यक्रमाचे वातावरण भारावून गेले.

सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी महाराष्ट्रभर एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कार्य सुरू असून, महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती दिली.
महिला व बालविकास विभागाच्या पुढाकारातून झालेल्या या उपक्रमामुळे एकल महिलांच्या प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधी व प्रशासनामध्ये संवेदनशीलता निर्माण होण्यास मदत झाली असून, शासकीय योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे महिलांपर्यंत पोहोचण्यास हातभार लागणार आहे.
“एकल महिला सशक्त तर समाज सक्षम” या संदेशासह महिलांच्या स्वावलंबनासाठी शिरूर नगरपरिषदेचा पुढाकार

संपादक : सुदर्शन दरेकर

