उद्योगताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशहर

शिरूरमध्ये शांततापूर्ण ‘लॉग मार्च’; नीट विद्यार्थ्यांना न्यायाची हाक, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी


शिरूर, : सुदर्शन दरेकर
नीट (NEET) परीक्षेतील कथित अनियमिततेचा निषेध, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा तसेच शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि नैतिक जबाबदारी निश्चित करण्याच्या मागणीसाठी शिरूर शहरात गुरुवारी विविध सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक संघटनांच्या वतीने शांततापूर्ण ‘लॉग मार्च’ काढण्यात आला. या आंदोलनात महाविद्यालयीन युवक-युवती, महिला, डॉक्टर, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या.
मार्चनंतर आंदोलनकर्त्यांनी शिरूर तहसील कार्यालय तसेच शिरूर पोलीस ठाणे येथे निवेदन सादर करून नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांना न्याय द्यावा आणि नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
या आंदोलनात माजी आमदार अशोक पवार, लोकजागृती संघटनेचे रवींद्र धनक, अविनाश शिंदे, बहुजन मुक्ती पार्टीचे फिरोजभाई सय्यद, डॉ. स्वप्ननील भालेराव तसेच शिरूर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनीता पोटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित वक्त्यांनी शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार, परीक्षांमधील कथित अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारा खेळ याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. अशा घटनांमुळे देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास टिकवण्यासाठी पारदर्शक व उत्तरदायी यंत्रणा उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
आंदोलनादरम्यान सहभागी नागरिकांनी शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या मांडत, विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली. संपूर्ण मार्च शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *