शिरूरकरांना मोठा दिलासा; हत्तीडोह बंधारा पूर्ण क्षमतेने भरला, पुढील ४० ते ४५ दिवसांच्या पाणीपुरवठ्याची चिंता मिटली..
शिरूर : सुदर्शन दरेकर
शिरूर : मान्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता आणि वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शिरूरकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. घोडनदीवरील हत्तीडोह येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्याने शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली असून, उपलब्ध जलसाठा पुढील ४० ते ४५ दिवस पुरेल, अशी माहिती शिरूर नगरपरिषद प्रशासनाने दिली आहे.
सुमारे ५० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शिरूर शहराचा पाणीपुरवठा घोडनदीवरील हत्तीडोह बंधाऱ्यावर अवलंबून आहे. सुमारे ५५ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेला हा बंधारा सध्या पूर्ण क्षमतेने भरला असून, त्यामुळे शहरासाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन शिरूर नगरपरिषदेने कुकडी विभागाच्या ६१ क्रमांकाच्या वितरिकेतून हत्तीडोह बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर केला होता. त्यानुसार मागील आठ दिवसांपासून घोडनदी पात्रातील बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येत होते.
शिरूर -हवेलीचे लोकप्रिय आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊलीआबा कटके यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून शिरूर शहरासाठी हत्तीडोह बंधाऱ्यात पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा केला. या प्रयत्नांना नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे तसेच पाणीपुरवठा सभापती सुनिताताई पोटे यांनीही समन्वय साधत सहकार्य केले. अखेर हत्तीडोह बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्याने शिरूरकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढील ४० ते ४५ दिवसांसाठी मार्गी लागला आहे.
बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे, उपनगराध्यक्ष मितेश गादिया, पाणीपुरवठा सभापती डॉ.सुनिता पोटे, महिला व बालकल्याण समिती सभापती आयेशा सय्यद, उपसभापती स्वप्नाली जामदार, नगरसेविका संगीता मल्लाव, नगरसेवक अभिजीत पाचर्णे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी यांनी हत्तीडोह बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध जलसाठ्याची माहिती घेतली.
मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
“हत्तीडोह बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शिरूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागला असून, उपलब्ध जलसाठा पुढील ४० ते ४५ दिवस पुरेल. नागरिकांनी पाण्याचा जपून आणि जबाबदारीने वापर करावा.” – शिरूर नगरपरिषद प्रशासन

संपादक : सुदर्शन दरेकर