शेतातील कामे सांगितल्याचा राग अनावर; ८४ वर्षीय आजोबांचा नातवाकडून लोखंडी गजाने निर्घृण खून बाभुळसर बुद्रुक (शिरूर) येथील हृदयद्रावक घटना; आरोपी नातू काही तासांत पोलिसांच्या ताब्यात
प्रतिनिधी :
शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे नातेसंबंधांना काळिमा फासणारी आणि समाजमन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना सोमवारी घडली. शेतातील कामे का सांगता, या किरकोळ कारणावरून संतापलेल्या एका २६ वर्षीय नातवाने आपल्या ८४ वर्षीय वृद्ध आजोबांवर लोखंडी गजाने अमानुष हल्ला करून त्यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत वृद्धाचे नाव दशरथ यशवंत राऊत (वय ८४) असे असून, आरोपी नातू सोमनाथ बाळासाहेब राऊत (वय २६) याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (दि. १५ जून २०२६) रोजी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास बाभुळसर बुद्रुक येथील राऊत कुटुंबाच्या राहत्या घरात ही घटना घडली. आजोबा दशरथ राऊत यांनी नातू सोमनाथ याला शेतातील काही कामांबाबत सूचना केल्या होत्या. मात्र, या गोष्टीचा राग मनात धरून संतापलेल्या सोमनाथने लोखंडी गजाने आजोबांच्या डोक्यावर आणि पाठीवर वारंवार प्रहार केले.
हल्ला इतका भीषण होता की गंभीर दुखापतीमुळे दशरथ राऊत यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. एका वृद्ध व्यक्तीचा स्वतःच्या नातवाच्या हातून झालेला मृत्यू ही घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करणारी ठरत आहे.
या प्रकरणी मृताचे पुत्र दुर्योधन दशरथ राऊत यांनी मांडवगण फराटा पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. ठाणे अंमलदार शेळके व अंमलदार पवार यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीचा शोध घेतला आणि काही तासांतच त्याला ताब्यात घेतले.
आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.
चावडी राज विशेष
“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा जीव नातवाच्या हातून जाणे ही केवळ एक गुन्हेगारी घटना नसून समाजातील वाढत्या असहिष्णुतेचे आणि कौटुंबिक मूल्यांच्या ऱ्हासाचे चिंताजनक उदाहरण आहे. क्षणिक राग आणि संताप किती भयंकर परिणाम घडवू शकतो, याचे हे विदारक वास्तव आहे.”
– चावडी राज न्यूज पोर्टल

संपादक : सुदर्शन दरेकर

