दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी शिरूर नगर परिषदेचा पुढाकार; १४० लाभार्थ्यांना १३ लाख रुपयांचे थेट वितरण
शिरूर | सुदर्शन दरेकर
शिरूर नगर परिषदेच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सुमारे १३ लाख रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले. या योजनेअंतर्गत १४० पात्र दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ९ हजार २८५ रुपये थेट जमा करण्यात आले.
या निधी वितरण कार्यक्रमाचे आयोजन शिरूर नगर परिषदेच्या रसिकलाल धारीवाल सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमास नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, उपनगराध्यक्ष मितेश गादिया, मुख्याधिकारी प्रीतमकुमार पाटील, बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव, स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती एजाज बागवान, पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनिता पोटे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आयेशा सय्यद, उपसभापती स्वप्नाली जामदार, सभापती स्वाती साठे, नगरसेवक सागर नरवडे, रवींद्र ढोबळे, अभिजित पाचर्णे तसेच नगरसेविका पूजा पोटावळे, सुनिता भुजबळ, संगीता मल्लाव, स्वीटी शिंदे, चारुशीला कोळपकर आणि रिंकू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी दिव्यांग बांधवांना शासनाच्या विशेष दिव्यांग पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन केले. या नोंदणीमुळे विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविणे अधिक सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ही नोंदणी प्रक्रिया शिरूर नगर परिषदेच्या माध्यमातून मोफत करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दिव्यांग नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना शासनाच्या विविध योजनांशी जोडण्यासाठी शिरूर नगर परिषद सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.

संपादक : सुदर्शन दरेकर

