ताज्या घडामोडीमहाराष्ट्रशहर

आधार छाया फाउंडेशनतर्फे पोलीस, एसटी चालक-वाहक व पत्रकार बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे कर्तव्य बजावणाऱ्या ‘भाऊं’प्रती जपली आपुलकीची भावना


शिरूर :सुदर्शन दरेकर
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण. या नात्याची जाणीव जपत आधार छाया फाउंडेशनतर्फे शिरूर पोलीस स्टेशन तसेच शिरूर एसटी बसस्थानक येथे पोलीस बांधव, एसटी महामंडळाचे चालक-वाहक आणि पत्रकार बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
सणासुदीच्या काळात प्रत्येक जण आपल्या कुटुंबासोबत आनंद साजरा करत असताना एसटी महामंडळाचे चालक व वाहक मात्र प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करण्यासाठी आपले कर्तव्य बजावत असतात. तसेच पोलीस बांधवही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेकदा सण-उत्सवाच्या दिवशी कुटुंबापासून दूर राहून सेवा बजावतात. अशा कर्तव्यनिष्ठ ‘भाऊं’प्रती प्रेम, आदर आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी आधार छाया फाउंडेशनने हा उपक्रम राबविला.


यावेळी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस बांधव, एसटी चालक-वाहक तसेच पत्रकार बांधवांच्या हातावर राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी व सुरक्षिततेसाठी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमातून ‘कर्तव्य बजावताना कुटुंबापासून दूर असलेल्या प्रत्येक भावाला बहिणीच्या प्रेमाची जाणीव व्हावी’ हा संदेश देण्यात आला.
आधार छाया फाउंडेशनच्या अध्यक्षा सविता अनिल बोरुडे यांच्या पुढाकाराने दरवर्षी रक्षाबंधनानिमित्त हा उपक्रम आयोजित केला जातो. यावेळी डॉ. वैशाली साखरे, प्रीती बनसोडे, छाया पाडळे, माया महाजन आणि रेश्मा शेख यांची उपस्थिती होती.

या उपक्रमामुळे पोलीस, एसटी कर्मचारी आणि पत्रकार बांधवांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत आधार छाया फाउंडेशनने माणुसकीच्या नात्याचा सुंदर संदेश दिला.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *