कुंभमेळ्यापूर्वी भीमाशंकरचा कायापालट; विकास प्रकल्पातील ९० टक्के काम पूर्ण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भीमाशंकर, प्रतिनिधी : देशातील प्रमुख बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास वेगाने सुरू असून, पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी विकास प्रकल्पातील सुमारे ९० टक्के काम पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भीमाशंकर येथील मुख्य मंदिरासमोर नव्याने उभारण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा तसेच ब्रह्मध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी सुरू असलेल्या मंदिर परिसर विकास आणि हेरिटेज वाडी प्रकल्पाची पाहणी करून कामाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी आमदार Dilip Walse Patil, बाबाजी काळे, जिल्हाधिकारी Jitendra Dudi, मंदिराचे विश्वस्त आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला देशभरातील भाविकांची मोठी श्रद्धा असून या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राबविण्यात येणारा प्रकल्प भविष्यात भीमाशंकरचे संपूर्ण रूप पालटणार आहे. मूळ मंदिराचा सभामंडप, जीर्णोद्धार आणि परिसर विकासाची कामे अत्यंत वेगाने सुरू असून मंजूर आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याचेही त्यांनी कौतुक केले.
हेरिटेज वाडी प्रकल्पांतर्गत सुमारे दीडशे घरे नव्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत असून नागरिकांसाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन गाव उभारले जात आहे. हे गाव केवळ पुनर्वसनापुरते मर्यादित राहणार नसून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही नवी दिशा देणारे ठरेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
- परिसरातील वाहतूक व्यवस्थेसाठी जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र रस्ते तयार करण्यात येत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी इलेक्ट्रिक वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून दुकाने, बसस्थानक आणि इतर सार्वजनिक सुविधा नियोजनबद्ध पद्धतीने विकसित केल्या जात आहेत. भाविक आणि स्थानिक व्यावसायिक या दोघांच्याही हिताचा विचार करून हा विकास आराखडा राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

भविष्यात या विकासकामांमुळे भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या पाच ते दहा पट वाढेल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी सुरू असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले.

संपादक : सुदर्शन दरेकर

