ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशहरशिक्षण-प्रशिक्षण

व्हायरल झालेल्या ज्येष्ठ वारकरी केरू खोरे यांच्या मदतीला प्रशासन; तहसीलदारांची घरी भेट, वीज जोडणीसह शासकीय योजनांचा लाभ देण्याचे आश्वासन


शिरूर | प्रतिनिधी
आषाढी वारीदरम्यान सोशल मीडियावर लाखो नागरिकांच्या मनाला भिडलेले ज्येष्ठ वारकरी केरू हरीभाऊ खोरे यांच्या संघर्षमय जीवनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह केरू खोरे यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
आषाढी वारीत सहभागी झालेल्या केरू खोरे यांच्या जीवनप्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. मुलाचा मृत्यू, जमिनीचा अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद, आर्थिक अडचणी आणि मूलभूत सुविधांचा अभाव अशा अनेक संकटांचा सामना करत असतानाही विठ्ठलावरील त्यांची अढळ श्रद्धा कायम असल्याचे या व्हिडिओतून समोर आले होते. या भावनिक कहाणीने राज्यभरातील नागरिकांना स्पर्श केला होता.
तहसीलदार मस्के यांनी प्रत्यक्ष त्यांच्या निवासस्थानी जाऊन संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या. यावेळी घरात अद्याप वीज जोडणी नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर वीज जोडणी देण्यात येईल, असे महावितरणकडून आश्वासन देण्यात आले.


याशिवाय केरू खोरे यांच्या जमिनीच्या वादाची माहिती घेऊन संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन सकारात्मक असल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका ज्येष्ठ वारकऱ्याच्या वेदनादायी जीवनकहाणीमुळे प्रशासन संवेदनशीलपणे पुढे सरसावल्याचे चित्र पाहायला मिळाले.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *