क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिरूर पोलिसांची मोठी कारवाई; कुख्यात गुंड योगेश मचालेच्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई!


27 गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी; बेकायदेशीर शस्त्रांसह दहशत माजवणाऱ्या टोळीविरोधात संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये कारवाई
प्रतिनिधी | शिरूर
शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर अग्निशस्त्रांच्या जोरावर दहशत निर्माण करून वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या कुख्यात गुंड योगेश केशव मचाले आणि त्याच्या गुन्हेगारी टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाईस विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांनी मंजुरी दिली आहे. या कारवाईमुळे शिरूरसह पुणे ग्रामीण परिसरातील संघटित गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे.
शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 235/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता, भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 19 मार्च 2026 रोजी मांडवगण फराटा येथील भैरवनाथ क्रिकेट मैदानावर घडला होता.
क्रिकेट स्पर्धेच्या बॅनरवर फोटो न लावल्याच्या वादातून झालेल्या भांडणानंतर फिर्यादी मिथुन ऊर्फ अमोल आनंदा चौगुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आरोपींनी पिस्तुलातून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या मित्रांवर दगडफेक, शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या गुन्ह्याचा तपास शिरूर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी संयुक्तपणे केला. तपासात एकूण सात आरोपींचा सहभाग स्पष्ट झाला. त्यापैकी अक्षय ऊर्फ ईश्वर पाटील, सूत्रधार लक्ष्मण शिंदे आणि पप्पू ऊर्फ सत्यम कड यांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. रुतिक चव्हाण आणि दिगंबर शेंडकर हे जामिनावर असून टोळीचा प्रमुख योगेश मचाले अद्याप फरार आहे.
तपासादरम्यान योगेश मचाले आणि त्याच्या टोळीविरुद्ध पुणे ग्रामीण व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, कट रचणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, खंडणी, दरोडा, शासकीय कामात अडथळा आदी गंभीर स्वरूपाचे एकूण 27 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.
या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला होता. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी कागदपत्रांची पडताळणी करून योगेश मचाले आणि त्याच्या संघटित गुन्हेगारी टोळीविरोधात मोक्का लागू करण्यास कायदेशीर मंजुरी दिली. त्यानंतर या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, तत्कालीन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, सध्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *