करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची पोलिसांकडून धिंड; शिरूर पोलिसांचा गुन्हेगारांना कडक इशारा

“गोळीबारातील आरोपींना घटनास्थळी नेऊन तपास; एसपी संदीप सिंग गिल्ल यांच्या इशाऱ्यानंतर शिरूर पोलिसांची धडक कारवाई”
शिरूर प्रतिनिधी :सुदर्शन दरेकर
शिरूर तालुक्यातील करडे गावात जुन्या वादातून एका तरुणावर पिस्तुलातून तीन राऊंड गोळीबार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी कठोर कारवाई करत आरोपींची करडे गावातून धिंड काढली. या कारवाईमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे.
शनिवारी पहाटे करडे येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागे, भैरवनाथ मंदिराजवळील तलाव परिसरात ही घटना घडली होती. जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर आरोपींनी एका तरुणाच्या दिशेने पिस्तुलातून तीन राऊंड फायर करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर शिरूर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत अवघ्या ७२ तासांत आरोपींना परजिल्ह्यातून ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपींना घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना (रीकन्स्ट्रक्शन) करण्यात आली. यावेळी आरोपींची करडे गावातून धिंड काढत पोलिसांनी कायदा हातात घेणाऱ्यांना कठोर इशारा दिला.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून गोळीबारासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल आणि इतर पुरावे जप्त करण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत.
दरम्यान, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल यांनी नुकत्याच शिरूर भेटीदरम्यान पत्रकारांशी बोलताना गुन्हेगारांना जरब बसेल, अशा पद्धतीने कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानंतर झालेली ही कारवाई त्या भूमिकेचीच प्रचिती मानली जात आहे.
तसेच, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी शहर व तालुक्यातील अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर कारवाईचा इशारा दिला असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशाच धडक मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत

संपादक : सुदर्शन दरेकर

