शिरूर तालुक्यात कुराडीने हल्ला; एक जखमी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर, दि. 28 : शिरूर तालुक्यातील पिंपळाची वाडी (निमोणे) येथे पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर कुराडीने हल्ला झाल्याची घटना घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात एकासह दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपत गणपत काळे (वय 55, रा. पिंपळाची वाडी, निमोणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय राजाराम काळे व दोन अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 125(a), 351(2), 351(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सोमवारी (दि. 27 जुलै) सकाळी साडेअकराच्या सुमारास फिर्यादी गोड नदीकाठी असलेल्या पाण्याच्या मोटारीची पाहणी करण्यासाठी गेले असता, प्रथम त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर आरोपीने कुराडीने डोक्यावर वार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय, शिरूर येथे उपचार करण्यात आले.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार टेंगले करीत आहेत.

संपादक : सुदर्शन दरेकर
