पिंपरी दुमाल्यात चोरांचा हैदोस; तीन शेळ्या चोरीला गणेगाव खालसा, रांजणगाव गणपतीतही चोरीचे प्रयत्न; संशयित सुमो गाडीमुळे नागरिकांमध्ये भीती

प्रतिनिधी – शिरूर
शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला परिसरात मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत शेतकऱ्याच्या गोठ्यातून तीन शेळ्या चोरी केल्याची घटना घडली. या चोरीत शेतकरी साहेबराव चिखले यांचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, २२ जुलैच्या मध्यरात्री सुमारे १ ते १.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. चोरीपूर्वी एक सुमो गाडी गावातील रस्त्यांवर संशयास्पदरीत्या वारंवार फिरताना काही नागरिकांच्या निदर्शनास आली होती. त्यानंतर चोरट्यांनी चिखले यांच्या गोठ्यात प्रवेश करून तीन शेळ्या लंपास केल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, याच रात्री गणेगाव खालसा परिसरातही मोठ्या प्रमाणावर शेळ्यांची चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच रांजणगाव गणपती येथील अष्टविनायक रोड परिसरात काही घरांच्या खिडक्या तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याची, तसेच काही कोंबड्यांचीही चोरी झाल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
एकाच रात्री पिंपरी दुमाला, गणेगाव खालसा आणि रांजणगाव गणपती परिसरात चोरीच्या घटना घडल्याने चोरट्यांची एकच टोळी सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चोरीसाठी वापरण्यात आल्याचा संशय असलेल्या सुमो गाडीचा शोध घेऊन या प्रकरणाचा सखोल तपास करावा, तसेच ग्रामीण भागातील रात्रीची पोलिस गस्त वाढवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पोलिसांकडून या घटनांचा तपास सुरू असून, संशयास्पद हालचाली अथवा वाहनांची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात येत आहे.

संपादक : सुदर्शन दरेकर

