कर्डे गोळीबार ; सराईत गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला करणारे ५ आरोपी ७२ तासांत जेरबंद
शिरूर | सुदर्शन दरेकर
करडे (ता. शिरूर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राऊंड गोळीबार करून जीवघेणा हल्ला करणाऱ्या पाच आरोपींना शिरूर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने अवघ्या ७२ तासांत परजिल्ह्यातून अटक केली आहे. या गुन्ह्यात दोन विधीसंघर्षित बालकांचाही सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी निखिल सतीश थेउरकर (वय २३, रा. करडे) यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६६९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमे तसेच शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक विनोद पाटील पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास करडे गावातील हनुमान मंदिरामागील भैरवनाथ मंदिराजवळील तळ्याशेजारी जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी करत पिस्तुलातून तीन राऊंड गोळीबार केला. या हल्ल्यात फिर्यादी बचावला असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी विशेष तपास पथके तयार केली. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा बसस्थानक परिसरात सापळा रचून पाच आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये अथर्व उर्फ टिन्या शेळके (रा. रांजणगाव गणपती), रोहन उर्फ दादया पंचमुख (रा. रांजणगाव गणपती), आदित्य लंघे (रा. करडे), निखिल कायस्थ (रा. कारेगाव) आणि सनी मस्के (रा. कारेगाव) यांचा समावेश आहे.
तपासात अथर्व शेळके व रोहन पंचमुख हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खंडणी, अवैध शस्त्र बाळगणे, मारहाण यांसारखे गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच फिर्यादी निखिल थेउरकर याच्यावरही खून, खुनाचा प्रयत्न, अवैध शस्त्र बाळगणे आणि गंभीर मारहाण यांसारखे पाच दखलपात्र गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.
प्राथमिक तपासानुसार, फिर्यादीने यापूर्वी आरोपी व दोन विधीसंघर्षित बालकांना मारहाण केल्याच्या रागातून हा गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व शिरूर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने केली. आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असून पुढील तपास सुरू आहे.

संपादक : सुदर्शन दरेकर

